Ashok Chavan on Rohit Pawar : रोहित पवारांचं जितकं वय आहे, तितका मला राजकारणाचा अनुभव; अशोक चव्हाणांचा जोरदार पलटवार (original) (raw)
Ashok Chavan on Rohit Pawar : नांदेडमध्ये काल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावर रोहित पवार यांनी विधानपरिषद, राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही? तुम्हीच सांगा, असे म्हणत अशोक चव्हाण यांना प्रयुत्तर दिले. आता अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांचे जेवढे वय तितका माझा अनुभव असल्याचा टोला लगावलाय.
राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर त्यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही बिनविरोध निवडून आलात. राम शिंदे यांचा अनुभव दांडगा आहे, ग्रामपंचायतपासून ते विधानसभा, मंत्री आणि आज ते सभापती झाले आहेत, असे कौतुक त्यांनी राम शिंदे यांचे केले होते. तर मला जेव्हा रोहित पवारांनी बोलावले होते, तेव्हा मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही : रोहित पवार
यावर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. रोहित पवार म्हणाले की, अशोक चव्हाण साहेब आपण मोठे आणि 'आदर्श' नेते आहात, आपल्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. पण आपल्याला भाजपमध्ये का जावं लागलं आणि आज आपल्यासारख्या मोठ्या नेत्याचं स्थान काय आहे? हे आख्ख्या राज्याला माहीत आहे. त्यासाठी कुणालाही कानात सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न खऱ्या खोट्याचा तर या प्रश्नाचं उत्तर कर्जत-जामखेडने दोनदा दिलंय. महत्वाचं म्हणजे विधानपरिषद, राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही? तुम्हीच सांगा, असे त्यांनी म्हटले.
मा. अशोक चव्हाण साहेब आपण मोठे आणि 'आदर्श' नेते आहात, आपल्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे, पण आपल्याला भाजपमध्ये का जावं लागलं आणि आज आपल्यासारख्या मोठ्या नेत्याचं स्थान काय आहे, हे आख्ख्या राज्याला माहित्येय. त्यासाठी कुणालाही कानात सांगायची गरज नाही... राहिला प्रश्न खऱ्या… pic.twitter.com/vuOJFDpDoP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 13, 2025
रोहित पवारांचे जेवढे वय तितका माझा अनुभव : अशोक चव्हाण
आता रोहित पवारांच्या टीकेवर अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय. लोकशाहीमध्ये विरोधकांची प्रसंशाच करू नये, अशी अपेक्षा असणं चुकीचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केलय. कर्जत जामखेडमध्ये सभापती राम शिंदे यांचे अस्तित्व आहे. ते रोहित पवार यांचे विरोधक जरी असले तरी राम शिंदे माझ्या जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले तर वाईट वाटायचे काहीच कारण नाही. मी विधानसभेत होतो, लोकसभेत होतो, रोहित पवारांचे जेवढे वय आहे, तितका माझा राजकीय अनुभव आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांना पुन्हा डिवचले आहे.
अशोक चव्हाणांनी घेतली बालाजी कल्याणकरांची फिरकी
दरम्यान, नांदेडमधील राम शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमातून अशोक चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयावरून शिंदे गटाचे नांदेड उत्तचे आमदार बालाजी कल्याणकर यांची चांगलीच फिरकी घेतली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालया मंजुरीमध्ये आमचा पण खारीचा वाटा आहे. मागच्या सरकारमध्ये असताना निर्णय झाला होता. केवळ कामाला मंजुरीसाठी सही बाकी होती. दुर्देवाने सरकार पडलं आणि शिंदेंचे सरकार आले. तेव्हा याचा फायदा घेत आमदार बालाजी कल्याणकर यांनी रेडिमेट फाईल नेली आणि मंजूर करून आणली. कल्याणकर हे खूप भाग्यवान आहेत, असे म्हणत चव्हाण यांनी खदखद व्यक्त करत कल्याणकर यांची फिरकी घेतली.
आणखी वाचा